News Cover Image

डॉ. विजय बिडकर विद्यालय पेठ येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

*डांग सेवा मंडळ संचलित डॉ. विजय बिडकर विद्यालय पेठ येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा*
📚📚📘📗📕📒📔✒️🖌️🖊️

*पेठ :* डांग सेवा मंडळ, नाशिक संचलित डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे शनिवार, दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती ‘शिक्षक दिन’ म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

शिक्षक दिनाचे औचित्य साधून विद्यालयात विद्यार्थ्यांनी ‘एक दिवस शिक्षकांच्या भूमिकेत’ हा उपक्रम राबवित शालेय व्यवस्थापनाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक-शिक्षिका तसेच शिपाई अशा विविध पदांची जबाबदारी स्वतः सांभाळत शाळेचे दैनंदिन कामकाज उत्साहाने पार पाडले. यासोबतच विद्यार्थ्यांनी अध्यापनाची जबाबदारी स्वीकारून ‘शिक्षक होण्याचा अनुभव’ घेतला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या जबाबदाऱ्या, शिस्त, नियोजन व कार्यपद्धती यांची प्रत्यक्ष जाणीव झाली.

त्यानंतर विद्यालयाचे प्राचार्य श्री. अशोक नंदन सर यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थ्यांनीच शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन केले. कार्यक्रमास विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. कैलास देशमुख सर यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, कर्मवीर दादासाहेब बिडकर व विद्येची देवता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थी मुख्याध्यापिका श्रावणी राऊत, उपमुख्याध्यापिका वेदिका रहाणे, अनिरुद्ध बकरे, विद्यार्थी पर्यवेक्षक वरद दोडे व विद्यार्थी शिक्षक यांनी विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षिकांचा गुलाबपुष्प व पेन देऊन सन्मान केला.

यावेळी विद्यार्थी शिक्षकांनी दिवसभर अध्यापन करताना आलेले अनुभव आपल्या मनोगतातून व्यक्त केले. शिक्षकाची भूमिका पार पाडताना आलेल्या जबाबदारीची जाणीव आणि शिक्षकांविषयीची कृतज्ञता त्यांनी भावपूर्ण शब्दांत व्यक्त केली.

कार्यक्रमात शिक्षक श्री. चंद्रकांत केदार व श्री. जनार्दन वाघमारे यांनी मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना शिक्षक दिनाचे महत्त्व समजावून सांगितले.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य श्री. अशोक नंदन सर यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या शैक्षणिक विचारांची माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका पार पाडत घेतलेला अनुभव हा त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे सांगून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन विद्यार्थी शिक्षिका काव्या पठाडे व शर्वरी पठाडे यांनी केले.

कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.