पेठ दि.18/07/2025 वार- शुक्रवार रोजी डांग सेवा मंडळ संचलित डॉ.विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे इयत्ता 5 वी ते 12 वी चा पालक शिक्षक मेळावा सन 2025- 26 मोठ्या उत्साहात पार पडला. विद्यार्थी गुणवत्ता वाढ व विकास, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या सोडवणे तसेच शालेय व्यवस्थापन समिती स्थापना करणे या हेतूने विद्यालयाचे प्राचार्य श्री.ए.एल.नंदन यांच्या अध्यक्षतेखाली पालक मेळावा घेण्यात आला. सर्वप्रथम प्रतिमापूजन करण्यात आले. त्यानंतर प्रास्ताविकात श्री.ए.एल.नंदन यांनी शालेय मागील वर्षातील उपक्रम व शाळेच्या प्रगती विषयी माहिती दिली. उपमुख्याध्यापक श्री.डी.जी.केला यांनी शालेय व्यवस्थापन समितीचे कार्य व भूमिका स्पष्ट करून नवनियुक्त शालेय व्यवस्थापन समितीच्या कार्यकारिणीची घोषणा केली व शाळेतील नवीन उपक्रमाविषयी माहिती करून दिली. यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा म्हणून खाजगी व्यवस्थापन अनुदानित शाळा नियमानुसार डांग सेवा मंडळ संस्थेच्या अध्यक्षा मा.श्रीमती.हेमलताताई बिडकर तर पालकांमधून उपाध्यक्ष म्हणून श्रीमती.मनिषा वायकंडे यांची नियुक्ती सर्वानुमते करण्यात आली. स्थानिक प्राधिकरण सदस्य म्हणून मा.नगरसेवक श्री.कुमार मोंढे, शिक्षणतज्ञ सदस्य म्हणून केंद्र प्रमुख श्री.महाले सर तर शिक्षक सदस्य म्हणून श्री.जे.एच.वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच प्रत्येक वर्गातून तुकडीनिहाय एका पालकाची नियुक्ती सदस्य म्हणून करण्यात आली तसेच एक विद्यार्थी व एक विद्यार्थिनीची नेमणूक सदस्य म्हणून करण्यात आली. शिक्षक पालक संवाद घडून सकारात्मक चर्चा झाली. पालकांपैकी श्री.सुरेश पवार, श्री.सचिन रहाणे व श्री. पांडुरंग इंपाळ यांनी आपले मनोगत व्यत केले. तसेच श्री.सी.डी.केदार सर, श्रीमती. पवार मॅडम, पर्यवेक्षिका श्रीमती.व्ही.सी.आचार्य यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री.जनार्दन वाघमारे यांनी केले.यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे माजी उपाध्यक्ष श्री.मनोज गुंजाळ , सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.आभार प्रदर्शन श्री.एन.के.जाधव यांनी केले.
